सॅनफ्रान्सिस्को – अमेरिकेच्या संसदीय समितीकडून बाजारपेठेवर प्रभाव टाकणाऱ्या फेसबुक, अमेझॉन, गुगल अशा मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचीही चौकशी सुरू आहे. या संसदीय चौकशी समितीचे अध्यक्ष जेरी नॅडलर (न्यूयॉर्क डेमोक्रॅटिक पक्ष) यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांची चौकशी केली. यावेळी त्यांनी फेसबुककडून इनस्टाग्रामची कंपनीने का खरेदी केली, याबाबत विचारणा केली.
जेरी नॅडलर यांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि अॅपलचे सीईओ टीम कुक यांचीही चौकशी केली. फेसबुकला इन्स्टाग्रामकडून धोका होणार असल्याने मार्क झुकेरबर्गने इन्स्टाग्रामची खरेदी केल्याचे काही ई-मेलमधून दिसून आले आहे. फेसबुकचा व्यवसाय इन्स्टाग्राम स्वत:कडे वळता करून घेईन, अशी फेसबुकला भीती होती. तसे त्यांनी स्वत: कबूल केल्याचे संसदीय चौकशी समितीचे अध्यक्ष जेरी नॅडलर यांनी ऑनलाईन सुनावणीत म्हटले आहे. फेसबुकने स्पर्धा करण्याऐवजी इन्स्टाग्रामची खरेदी केली. हे स्पर्धात्मकतेच्या विरोधात जावून कंपनी ताब्यात घेणे आणि अँटीट्रस्ट कायद्याचा भंग असल्याचे नॅडलर यांनी म्हटले.
मार्क झुकेरबर्गने आपली बाजू मांडताना म्हटले, की संघराज्य व्यापार आयोगाकडे सर्व कागदपत्रे आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामची मालकी घेताना एकमताने मंजुरी दिली होती. त्यावेळी कोणीही विरोध केला नव्हता. इन्स्टाग्राम मोठी कंपनी होवू शकते, असे साहजिकच वाटते. मात्र, तेव्हा इन्स्टाग्राम कंपनी या पल्ल्यापासून खूप दूर होती, हे समजून घ्या.