नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशातील औषध उद्योग आणि वैद्यकीय साधनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना चार योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. त्यामधून देशातील उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी, असा सरकारचा हेतू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेला अनुसरून औषधी उद्योगांसाठी योजना आखल्याचे केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मेक इन इंडियांतर्गत 53 महत्त्वाच्या क्रियाशील औषधी द्रव्यघटकांचे (एपीआयए) देशातच उत्पादन करण्याचे सरकारने ध्येय निश्चित केले आहे. त्याचबरोबर आयातीवर अवलंबून असलेल्या वैद्यकीय साधनांचे देशातच उत्पादन करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे गौडा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यासाठी सरकारने एपीआय आणि वैद्यकीय साधनांचे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी योजना जाहीर केल्या आहेत. ही योजना आखण्यासाठी औषधी उद्योगातील भागीदारांसह राज्य सरकारांशी परिश्रमपूर्वक चर्चा करण्यात आली आहे.
योजनेतील पार्कचे ठिकाणे ही संघराज्यातील स्पर्धात्मकता आणि उद्दिष्टपूर्तीसाठी लागणारे निकष पाहून करण्यात येणार आहेत. मार्गदर्शक सूचनांसाठीचे निकष पाहून पात्र उत्पादकांची निवड करण्यात येत असल्याचे केंद्रीय रसायन मंत्री गौडा यांनी ट्विटमध्ये नमूद केल आहे.
औषधी कंपन्यांना पार्कमध्ये या मिळणार सुविधा
उत्पादकांना राज्य व केंद्र सरकार या दोघांचीही मदत मिळणार आहे. या पार्कमध्ये निवड होणाऱ्या उत्पादकांना आधीच नियामक संस्थांकडून मंजुरी देण्यात येणार आहे. त्यांना पार्कमध्ये पायाभूत सुविधा, उत्कृष्ट संपर्कयंत्रणा, परवडणाऱ्या दरात जमीन, स्पर्धात्मक शुल्क आणि बळकट अशी संशोधन आणि विकास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.