मुंबई - आयसीआयसीआय बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि माजी सीईओ चंदा कोचरचे पती दीपक कोचर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले. ईडीने दीपक कोचर यांना सोमवारी अटक केली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दीपक कोचर यांना आधी मुंबईमधील ईडीच्या कार्यालयात चौकशी नेले. त्यांनंतर विशेष पीएमएलए न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले. आयसीआयसीआय बँकेचे तत्कालीन सीईओ चंदा कोचर यांनी व्हिडीओकॉनला कर्ज देताना नियमांचे उल्लंघन केल्याचा ईडीला संशय आहे. ईडीने चंदा कोचर, त्यांचे पती आणि कंपनीची सुमारे ७८.१५ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जानेवारीत जप्त केली आहे. यामध्ये तामिळनाडू आणि महाराष्ट्रामधील फ्लॅट, जमीन, रोख रक्कम, कारखाना आणि मशिनरीचा समावेश आहे.
चंदा कोचर यांनी व्हिडीओकॉनला १ हजार ८७५ कोटी रुपयांचे बेकायदेशीर कर्ज दिल्याचा आरोप आहे. आयसीआयसीआय बँकेचे तत्कालीन अध्यक्षा चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने न्यूपॉवर रिन्यूएबल प्रायव्हेट लिमिटेड (एनआरपीएल) कंपनीला ६४ कोटींचे कर्ज मंजूर केले. ही कंपनी यापूर्वी न्यूपॉवर रिन्यूएबल लि. (एनआरएल) या नावाने दीपक कोचर यांच्या मालकीची कंपनी होती.
एनआरएल या कंपनीने १०.६५ कोटी रुपयांचा महसूल मिळविला होता. गुन्ह्यातील एकूण ६४.६५ कोटी रुपयांचा निधी एनआरपीएलमध्ये वळविण्यात आला होता. याप्रकरणी ईडीकडून दीपक कोचर यांची चौकशी करण्यात येत आहे.