नवी दिल्ली – महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) सोने तस्करीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. डीआरआयने 83.6 किलोच्या सोन्याच्या वड्या (बार) नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकातून जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेले 99.9 टक्के शुद्धतेचे सोने हे म्यानमारमधून तस्करीने देशात आणण्यात आले आहे.
सोन्याच्या तस्करीसाठी मणिपूरमधील मोरेह येथील आंतरराष्ट्रीय सीमारेषेचा वापर केल्याचे तपासात आढळल्याची ईटीव्ही भारतला सूत्राकडून माहिती मिळाली आहे. सूत्राच्या माहितीनुसार दिल्लीमधून जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 43 कोटी रुपये आहे.
डीआरआयने नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर आलेल्या आठ प्रवाशांना शुक्रवारी (28 ऑगस्ट) दुपारी पकडले. ते दिब्रुगढ ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस आले होते. त्यांच्याकडून तस्करी करून आणलेल्या 504 सोन्याच्या वड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या सोन्याच्या वड्यांचे वजन एकूण 83.621 किलो असल्याचे सूत्राने सांगितले.
आठही आरोपींना न्यायालयीन कोठडी!
सर्व आठही आरोपींना शनिवारी महागनर दंडाधिकाऱ्यांसमोर शनिवारी उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याचे सूत्राने ईटीव्ही भारतला सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून गुप्तचर यंत्रणेला मिळणाऱ्या माहितीवरून ही कारवाई केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. खास शिवलेल्या ड्रेसमध्ये या सोन्याच्या वड्या आरोपींनी लपवल्या होत्या. हे प्रवासी बनावट आधारकार्डने प्रवास करत असल्याचे आढळून आल्याचे सूत्राने ईटीव्ही भारतला सांगितले.
अशी होती तस्करीची पद्धत
महसूल गुप्तचर संचालनालयातील सूत्राच्या माहितीनुसार तस्करी करून आणलेले सोने दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमधील बाजारात आणि ज्वेलरीमध्ये बदलून विकण्यासाठी गुवाहाटीमधून टोळी कार्यरत येत होती. ही टोळी देशाच्या विविध ठिकाणातील गरीब आणि गरजू व्यक्तींना तस्करीचे सोने घेवून जाण्याचे काम देत होती. त्याबदल्यात गरजुंना झटपट आणि मोठ्या प्रमाणात पैसे देण्याचे आमिष दाखविले जात होते.
हवाई, जमीन आणि रेल्वेच्या मार्गासह स्थानिक वाहतुकीचा सोने तस्करीसाठी वापर करण्यात आला होता. उत्पादन शुल्क कायदा 1962 नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. सोने तस्करीबाबतचा पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.