नवी दिल्ली – सीमारेषेवर चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याने देशामध्ये संतप्त भावना आहे. दिल्ली हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटनेने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर, चीनच्या कोणत्याही नागरिकाला हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा न देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्यासाठी देशभरात मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला पाठिंबा देत असल्याचे दिल्ली हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटनेने म्हटले आहे. आम्ही आमच्या आस्थापनांमध्ये कोणत्याही चिनी मालाचा वापर करणार नाही, असे संघटनेने म्हटले आहे. तसे पत्र संघटनेने सीएआयटीला दिले आहे.
शूर भारतीय जवानांवर चीनचे सैनिक सीमारेषेवर हल्ला करीत आहेत. अशा परिस्थितीत चीनच्या कोणत्याही नागरिकाला हॉटेलमध्ये राहण्यासाठी जागा दिली जाणार नाही. दिल्ली हॉटेल संघटनेच्या या निर्णयाचे सीएआयटीने स्वागत केले आहे. सीएआयटीचे महासचिव प्रवीण खंडेलवार म्हणाले, की वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना चीनच्या मालांवर बहिष्कार टाकण्याची इच्छा आहे, हे दिसून आले आहे.
पूर्व लडाखमध्ये 15 जूनला चीनच्या सैनिकांबरोबर झालेेल्या झटापटीत 20 जवानांना वीरमरण आले आहे. त्यानंतर चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.