कोलकाता - संरक्षण उत्पादनांची निर्यात यंदा ३५ हजार कोटींचे उद्दिष्ट पार करेल, असा विश्वास संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव अजय कुमार यांनी व्यक्त केला. खासगी उद्योगाने संरक्षण उत्पादनात सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहन देण्याकरीता ते शहरात आले होते. अजय कुमार यांनी भारत चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये संरक्षण उत्पादनाकरीता सुविधा केंद्राचे उद्घाटन केले.
संरक्षण उत्पादनाचे सुट्टे भाग हा निर्यातीमधील महत्त्वाचा घटक असल्याचे अजय कुमार यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, संरक्षण उत्पादनांची निर्यात वरचेवर वाढत आहे. हे उत्पादन म्हणजे एक मोठा खडकासारखे आहे. ते ढकलण्यासाठी कठीण आहे. मात्र एकदा फिरायला सुरुवात झाली तर जास्त वेग येईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
पहिल्या तिमाहीत ५ हजार ६०० कोटींची निर्यात -
गतवर्षी संरक्षण उत्पादनांची १० हजार ७०० कोटींची निर्यात झाली होती. तर चालू वर्षात केंद्र सरकारने २० हजार कोटींच्या निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पहिल्या तिमाहीत ५ हजार ६०० कोटींची निर्यात झाल्याची त्यांनी माहिती दिली.
उत्पादन धोरणात महत्त्वाचे बदल -
खासगी क्षेत्र, एमएसएमई क्षेत्रामधून संरक्षण उत्पादन वाढविण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी उत्पादन धोरणात महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आयुधनिर्माण कारखाना मंडळ आणि सरकारी संरक्षण कंपन्या या विविध ३०० उत्पादने बाहेरून मागविणार आहेत. त्यामुळे एमएसएमई क्षेत्राला चालना मिळणार आहे. खासगी कंपन्यांना स्वत:हून संरक्षण उत्पादन घेण्याची सरकारने परवानगी दिली आहे. त्याबाबतचे सहा ते सात प्रस्ताव सरकारने मंजूर केल्याची माहिती अजय कुमार यांनी दिली.