नवी दिल्ली - कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अशात खनिज तेलाची मागणी घटली असतानाही प्रमुख तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी केले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराने जून २०१७ नंतर दराचा निचांक गाठला आहे.
खनिज तेलाच्या प्रति बॅरलचा दर हा ९ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ४५.५० डॉलर झाला आहे. चालू वर्षात ८ जानेवारीला खनिज तेलाच्या प्रति बॅरलचा दर ७१.७५ डॉलर होता. चालू वर्षात खनिज तेलाचे दर ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. खनिज तेलाचे दर घसरत असल्याने तेल कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
हेही वाचा-आरबीआयच्या निर्बंधानंतर येस बँकेवर 'हे' नियम लागू होणार
अँजेल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले, की कोरोना विषाणुमुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला धोका आहे. त्यामुळे उर्जेची मागणी कमी झाली आहे. रशियाने मागणीच्या प्रमाणात खनिज तेलाचे उत्पादन कमी करण्यास नकार दिला आहे. केडिया अॅडव्हायझरीचे अजय केडिया म्हणाले, की खनजि तेलाची मागणी व पुरवठा यामध्ये फरक आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या किमतीवर काही काळ दबाव असणार आहे.
हेही वाचा-खरंच येस बँकेवरील संकट टळू शकले असते का?
अमेरिकेच्या उर्जा माहिती प्रशासनाने खनिज तेलाची मागणी प्रति दिन १०.०३ कोटी बॅरेलने कमी होईल, असा अंदाज केला आहे. कारण पहिल्या तिमाहीत खनिज तेलाचे चांगले उत्पादन झाले आहे.