नवी दिल्ली - देशातील १० पैकी ८ मातांना तंत्रज्ञानामुळे पालकत्वाची जबाबदारी सांभाळणे सोपे जाते, असे वाटते. तर ७० टक्के मातांनी मुलांच्या संगोपनासाठी स्मार्टफोनचा वापर करत असल्याचा दावा केला. ही माहिती एका सर्व्हेतून समोर आली आहे.
पालकत्वासाठी स्मार्टफोन हे सर्वात अधिक वापरण्यात येणारे साधन आहे. मात्र केवळ ३८ टक्के जणांनी त्यांचे मित्र व कुटुंबांना स्मार्टफोनची शिफारस करण्याची तयारी दर्शविली आहे. ही माहिती यु गव्ह या इंटरनेट मार्केट संशोधन संस्थेच्या अभ्यासातून समोर आली आहे. पालकत्वासाठी असलेल्या अॅपचा सर्वात अधिक वापर होतो. अनेक माता पालकत्वाच्या सल्ल्यासाठी त्यांच्या कुटुंबावर अवलंबून असतात. असे असले तरी त्या माता पूर्वीच्या मातांहून अधिक ऑनलाईन ब्लॉग आणि इतर ऑनलाईन माहितीचा आधार घेतात.
या सर्व्हेसाठी यु गव्हने १२ महिने ते १८ वर्षे वयाची मुले असणाऱ्या मातांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये तरुण आणि अधिक वयस्कर असे मातांचे वर्गीकरण केले आहे. यामध्ये १२ महिने ते ३ वर्षांची मुले असणाऱ्या मातांना तरुण माता म्हणून संबोधले आहे. संस्थेने एकूण ७०० मातांकडून माहिती घेतली आहे. तंत्रज्ञान ही बाब पालकत्वासाठी महत्त्वाची असली तरी त्याबाबत मातांना भीतीही वाटते, असे अहवालात म्हटले आहे.