जगदलपूर\विजापूर : पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणात मोठं यश मिळालंय. विजापूरचे सायबर पोलीस आणि आरोपींना पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष एसआयटी पथकानं हत्येतील मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर याला हैदराबाद येथून अटक केलीय. रविवारी (5 जाने.) रात्री उशिरा पथकानं ही कारवाई केली. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी या अटकेला दुजोरा दिलाय.
संपूर्ण घटनाक्रमावर एक नजर टाकूया :
कोण आहेत मुकेश चंद्राकर? : मुकेश चंद्राकर हे तरुण पत्रकार होते. त्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांसाठी स्वतंत्र पत्रकार म्हणून काम केलं. मुकेश 'बस्तर जंक्शन' हे यूट्यूब चॅनल चालवत असे. त्यांचे दीड लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स होते. एप्रिल 2021 मध्ये विजापूरमध्ये टकलागुडा नक्षलवादी हल्ल्यानंतर कोब्रा कमांडो राकेश्वर सिंह मन्हास यांची नक्षलवाद्यांच्या कैदेतून सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर मुकेश चंद्राकर प्रकाशझोतात आले. या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मुकेश चंद्राकर आणि मध्यस्थ करणाऱ्या टीमची भेट घेतली होती.
- मुकेश चंद्राकर 1 जानेवारीपासून बेपत्ता : मुकेश चंद्राकर हे 1 जानेवारीच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते. त्यांचा भाऊ युकेश चंद्राकर यानं आधी स्वतःहून भावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भाऊ मुकेश 1 जानेवारी रोजी बेपत्ता झाल्याची माहिती पोस्ट करण्यात आली. युकेशनं विजापूर पोलिसांनाही याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुकेश चंद्राकरचा शोध सुरू केला.
मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह 3 जानेवारीला सेप्टिक टँकमध्ये सापडला : विजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी सांगितलं की, मुकेश यांच्या मोबाईल क्रमांकाच्या शेवटच्या लोकेशनच्या आधारे त्यांचा मृतदेह शुक्रवारी, 3 जानेवारी रोजी ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्या आवारातून जेसीबीनं बाहेर काढण्यात आला. आवारात एक सेप्टिक टँक होती. यामध्ये पत्रकाराच्या हत्येनंतर मृतदेह टाकून वर प्लास्टर करण्यात आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह जेसीबीच्या सहाय्यानं बाहेर काढला.
सुरेश चंद्राकरनं का केली हत्या? : आरोपी ठेकेदार सुरेश चंद्राकर यानं बांधलेल्या रस्त्यातील भ्रष्टाचार मुकेश चंद्राकर यांनी उघड केला होता. हे प्रकरण पत्रकाराच्या हत्येचा मुख्य आधार मानले जात आहे. या हत्येतील कंत्राटदार सुरेश चंद्राकर हा मुख्य आरोपी आहे. त्यानं त्याचा भाऊ रितेश चंद्राकर आणि पर्यवेक्षक महेंद्र रामटेके यांच्यासोबत मिळून पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.
- 4 जानेवारीला विजापूर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली : पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी 4 जानेवारीला रितेश चंद्राकर, पर्यवेक्षक महेंद्र रामटेके आणि दिनेश चंद्राकर यांना अटक केली. स्थानिक लोकांचा रोष आणि पत्रकारांचा दबाव वाढल्यानंतर सरकारनं एसआयटीची स्थापना केली. त्यानंतर पथकानं मुख्य आरोपी आणि ठेकेदार सुरेश चंद्राकरला हैदराबाद येथून अटक केली.
सुरेश चंद्राकर ड्रायव्हरच्या अड्ड्यावर लपला होता : मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर हा हैदराबादमध्ये त्याच्या ड्रायव्हरच्या अड्ड्यावर लपून बसला होता. मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी 200 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि सुमारे 300 मोबाईल नंबर ट्रेस केले. त्यानंतर मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरला अटक करण्यात आली.
हेही वाचा -