मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आज लागोपाठ २०व्या दिवशी डिझेलच्या किमतीत १७ पैशांची वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या किमतीत २१ पैशांनी वाढ झाली आहे. ७ जूनपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात ८ रुपये ८७ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या किमतीत १० रुपये ८० पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेलची किंमत ही पेट्रोलपेक्षा अधिक आहे. आता या दोन्ही इंधनांची किंमत ८० रुपयांच्या पुढे गेली आहे. पेट्रोल १९ महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर विकले जात आहे.
- दिल्ली : पेट्रोल- ८०.१३ रुपये प्रति लिटर, डिझेल- ८०.१९ रुपये लिटर
- मुंबई : पेट्रोल- ८६.९१ रुपये प्रति लिटर, डिझेल- ७८.५१ रुपये लिटर
- कोलकाता : पेट्रोल- ८१.८२ रुपये प्रति लिटर, डिझेल- ७५.३४ रुपये लिटर
- चेन्नई : पेट्रोल- ८०.३७ रुपये प्रति लिटर, डिझेल- ७७.४४ रुपये लिटर
- बंगळुरू : पेट्रोल- ८२.७४ रुपये प्रति लिटर, डिझेल-७६.२५ रुपये लिटर
- लखनऊ : पेट्रोल- ८०.७५ रुपये प्रति लिटर, डिझेल- ७२.१८ रुपये लिटर
- पुणे : पेट्रोल- ८६.४२ रुपये प्रति लिटर, डिझेल- ७६.७९ रुपये लिटर
पूर्वी, पेट्रोलपेक्षा डिझेलवर कर कमी प्रमाणात लावण्यात येत असल्याने डिझेलच्या किमती या लिटरला १८ ते २० रुपये एवढ्या कमी होत्या. कालांतराने करांचे प्रमाण वाढत गेले. तसेच पेट्रोल व डिझेलवरील करांमधील फरक कमी होत गेला. डिझेलच्या एकूण विक्री किमतीपैकी ६३ टक्के वाटा हा विविध करांचा आहे. सध्या डिझेलवर ४९.४३ रुपये एवढा कर आकारला जातो. यापैकी ३१.८३ रुपये हे केंद्रीय अबकारी कराचे असून, १७.६० रुपये व्हॅटचे आहेत. पेट्रोलवरील करांचा भार ६४ टक्के आहे. सध्या प्रतिलिटर ५०.६९ रुपये कर असून, ३२.९८ रुपये केंद्रीय अबकारी कर, तर १७.७१ रुपये व्हॅट आकारला जातो.
आतापर्यंत डिझेलचा सर्वाधिक दर १६ ऑक्टोबर २०१८ रोजी नोंदविला गेला होता. त्या दिवशी राजधानी दिल्लीत डिझेलची विक्री ७५.६९ रुपये प्रतिलिटर या दराने झाली. ४ ऑक्टोबर २०१८ ला पेट्रोलचा दर राजधानी दिल्लीमध्ये हा दर ८४ रुपये प्रतिलिटर असा सर्वाधिक होता.