औरंगाबाद - लॉकडाऊन काळात तलावात पोहण्याचा मोह न आवरल्याने दोन मुलांचा पाण्यात बुडुन अंत झाल्याची घटना शहरात घडली. तर, मुलांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतलेल्या वडिलांना वाचवण्यात यश आले. ही घटना आज (गुरुवार) मिटमिटा येथील तलावात घडली. यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सुमित सुनील घोलप (वय-13), आणि रोहित देशमुख (वय-12) अशी पाण्यात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. तर, सुनील शंकरराव घोलप यांना वाचविण्यात यश आले.
या दुर्दैवी घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी घोलप हे त्यांचा 13 वर्षीय मुलगा सुमित आणि 12 वर्षीय रोहित या दोघांना घेऊन मिटमिटा तलावात पोहोण्यासाठी आले होते. बराचवेळ तलावाच्या काठावर बसून तिघांनी अंघोळ केली. मात्र, मुले पोहत काठाच्या काही पुढे पाण्यात गेले दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले पाण्यात बुडाली. घोलप यांनी मुलांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली, मात्र तेदेखील बुडू लागले. तेथे उपस्थित नागरिकांनी हा प्रकार पाहिला, त्यानंतर आरडाओरड केल्यावर शेजारील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांनी तलावाकडे धाव घेतली, आणि सुनील घोलप यांना वाचविले.
दरम्यान, एका नागरिकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. छावणी पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले आणि पाण्यात बुडालेल्या दोन्ही चिमुकल्यांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघांचीही प्राणज्योत मालवली होती. या दोघांना घाटी रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे करीत आहेत.