दिंडोरी (नाशिक)- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पर्यटन क्षेत्र बंद आहेत. मात्र दिंडोरी व चांदवड तालुक्याच्या हद्दीवरील धोडप किल्ल्यावर पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, हट्टी ग्रामपंचायतीने किल्ल्यावरील प्रवेशद्वारावर सूचना फलक लावून, शासनाचे आदेश येईपर्यंत किल्ल्यात प्रवेश न करण्याची विनंती केली होती. मात्र, या सुचनेची पायमल्ली करत काही पर्यटक किल्ल्याकडे जात होते. या पर्यटकांना अडवून हट्टी ग्रामस्थांनी त्यांना शिक्षा केली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना देखील काही पर्यटक बेजबाबदारपणे वागत असून किल्ल्यावर फिरायला येत आहे. त्यामुळे किल्ला परिसरातील गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने किल्ल्यावर प्रवेश निषेधची सूचना देणारा बोर्ड लावला होता. असे असताना देखील पर्यटक मानत नसल्याने आज ग्रामस्थांनी त्यांना अद्दल घडवली. ग्रामस्थांनी पर्यटकांना रस्त्यात अडवून त्यांना शिक्षा केली. व यानंतर शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत किल्ल्यावर येऊ नये अशी तंबी दिली.
हेही वाचा - 'महिलांचा सन्मान राखणारा शिवरायांचा महाराष्ट्र हे मुख्यमंत्र्यांनी कृतीतून दाखविण्याची वेळ'
धोडप किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंचावर असलेला व तिसऱ्या क्रमांकाचे पर्यटनस्थळ असून हा किल्ला प्रामुख्याने सप्तश्रृंगी गडाच्या पर्वत रांगात वसलेला आहे. किल्ल्यावर एक महादेव मंदिर, देवीचे मंदिर, एक खिंड व बुरुज आहे. येथे पेशवेकालीन वस्तू देखील आहेत. तसेच, हा किल्ला निसर्गाच्या सानिध्यात असल्याने तो पर्यटकांना साद घालतो. त्यामुळे या किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी असते. मात्र, कोरोना संकट बघता पर्यटकांनी किल्ल्यावर येऊ नये, अशी विनंती हट्टी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन परदेशी व ग्रामस्थांनी केली आहे.