नवी दिल्ली - आयपीएलचा १२ वा मौसम शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचला आहे. या लीगमध्ये सर्वच देशातील खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सीजनमध्ये एक अनोखा विक्रम पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या त्रिकुटाने एक अनोखा विक्रम केला आहे. जो आजपर्यंत कुणालाच करता आला नाही. या तिघांनी मिळून आयपीएलमध्ये बळीचे अर्धशतक पूर्ण केले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस, कंगिसो रबाडा आणि फिरकीपडू इम्रान ताहिर यांनी मिळून बळीचे अर्धशतक पूर्ण केले आहे. या सीजनमध्ये तिघांनी मिळून ६१ बळी घेतले आहेत. कंगिसो रबाडाने १२ सामन्यात २५, इम्रान ताहिर १५ सामन्यात २३ तर ख्रिस मॉरिसने ९ सामन्यात १३ गडी बाद केले आहेत. या आधी आयपीएलमध्ये एकाच सीझनमध्ये एकाच देशातील खेळाडूंना ५० बळी घेण्याचा पराक्रम करता आला नाही.
विश्वचषकापूर्वी या तिघांची ही कामगिरी त्यांचा उत्साह वाढविणारी आहे. हे तिघेही यंदाच्या विश्वचषकात आफ्रिकेच्या संघात खेळताना दिसून येतील. ख्रिस मॉरिसची तर संघात अचानक एन्ट्री झाली आहे. रबाडा दुखापतीमुळे आयपीएलमधून मागील आठवड्यात मायदेशी परतला आहे, तर ख्रिस मॉरिस आणि इम्रान ताहिर हे आयपीएलमध्ये खेळत आहेत.