जालना - गोंदी येथील गोदावरी नदीच्या पात्रातून शासनाची रॉयल्टी बुडवून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या ७ ट्रॅक्टरवर गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवानंद देवकर यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करण्यात आली . अवैध वाळू आणि ७ ट्रॅक्टर असा एकुण ३५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अंबड तालुक्यातील गोंदी येथील गोंदेश्वर मंदिराजवळ गोदावरी नदीच्या पात्रात अवैध रित्या वाळूचे उत्खनन सुरू होते. शासनाची रॉयल्टी न भरता ट्रॅक्टरमधून वाळूची चोरी केल्या जात असल्याची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवानंद देवकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी गोदावरी पात्रात धाव घेवून वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरची धरपकड केली. यावेळी ट्रॉलीमध्ये वाळू भरलेले ७ ट्रॅक्टर रंगेहाथ पकडून त्यांच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले. या ट्रॅक्टरचे चालक महेंद्र कचरु खरात, अनिल बाळू घुणासे, शकील गुलाब सय्यद, कृष्णा प्रभाकर एकलारे, हर्षद हनुमंत सोळुंके, योगेश रमेश वाघमारे, गजानन शिंदे (सर्व रा. गोंदी) यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ७ ट्रॅक्टर, त्यांच्या वाळू भरलेल्या ट्रॉल्या असा एकुण ३५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक यशवंत मुंढे यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक एस चैतन्य, अप्पर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवानंद देवकर, पोलीस नाईक अशोक गाढवे, यशवंत मुंढे, अमर पोहार, खरात, अविनाश पगारे, खांडेकर आदींनी केली आहे.