कोलकाता - रविवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात कोलकात्याने मुंबईचा ३४ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईकडून अष्टपैलू हार्दिक पंड्याने एकाकी झुंझार खेळी केली. हा सामना जरी मुंबईने हरला असला तरी क्रीडा रसिकांची मने जिंकण्यात हार्दिक यशस्वी झाला. पंड्याच्या या वादळी खेळीवर बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंह फिदा झाला आहे.
पंड्याची खेळी पाहून रणवीरने ट्विटमध्ये लिहिले, की हार्दिक किती मस्त भिडला, किती सुरेख त्याची फलंदाजी. रणवीरनंतर सचिन तेंडुलकरने ही ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे, सचिनने लिहिले की, खरोखरच पंड्याने चांगली खेळी केली. त्याला संघाकडून सपोर्ट मिळाला नाही. विजय मिळविल्याबद्दल कोलकात्याचे अभिनंदन.
हार्दिक पंड्याने १७ चेंडूत ७ षटकार आणि १ चौकारच्या सहाय्याने वेगाने अर्धशतक पूर्ण केले. त्याने पंतचा १८ चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम मोडीत काढला. हार्दिकने ३४ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांची आतषबाजी करत ९१ धावांची वादळी खेळी केली.
नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम कोलकात्यास प्रथम फलंदाजीस पाचारण केले. कोलकात्याने निर्धारित २० षटकात २ बाद २३२ धावा केल्या. प्रत्त्युतरात मुंबईला ७ बाद १९८ धावाच करता आल्या. कोलकात्याचा आयपीएलमधील हा १०० विजय आहे. तसेच मुंबई विरुद्ध कोलकात्याचा हा ४ वर्षातील पहिला विजय आहे.