पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 5 दिवसांपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शहरात कडेकोट बंदोबस्त असून संचारबंदी देखील लागू आहे. अशा वेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 3 हजार 524 नागरिकांवर 188 नुसार कारवाई करत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 5 दिवसांपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरात लॉकडाऊनला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाला रोखण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल असे बोलले जात आहे. दरम्यान, कडक लॉकडाऊन असताना अनेकांनी नियमांची पायमल्ली केली असून अशांवर कठोर पाऊल उचलत पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरातील विविध परिसरातील एकूण 3 हजार 524 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 88 जणांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
लॉकडाऊन काळात नियमांची पायमल्ली केलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी
1) सोमवारी 13 जुलै- 744 गुन्हे दाखल / 45 वाहने जप्त
2) मंगळवार 14 जुलै- 752 गुन्हे दाखल
3) बुधवार 15 जुलै- 558 गुन्हे दाखल / 1 वाहन जप्त
4) गुरुवार 16 जुलै- 635 गुन्हे दाखल / 5 वाहने जप्त
5) शुक्रवार 17 जुलै- 611 गुन्हे दाखल / 37 वाहने जप्त
6) शनिवार 18 जुलै- 224 गुन्हे दाखल
एकूण- 3524 गुन्हे दाखल / 88 वाहने जप्त