लंडन - बँकेतील घोटाळा आणि अवैध संपत्तीप्रकरणातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या कोठडीत 27 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि अवैध संपत्ती प्रकरणी आरोपी नीरव मोदी याला ब्रिटनच्या एका न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सादर केले जाणार आहे.
मागील वर्षी मार्चमध्ये अटक झाल्यानंतर पासूनच 49 वर्षीय हिरे व्यापारी नैऋत्य लंडनच्या वॉन्डस्वर्थ तुरुंगात कैदेत आहे. त्याला लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात जिल्हा न्यायाधीश वेनेसा बॅरेटसर यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले होते.
मोदी याला पुढील सुनावणी ही प्रकरण व्यवस्थापन सुनावणी असेल, असे सांगण्यात आले आहे आणि याच्यानंतर 7 सप्टेंबरपासून पुढे पाच दिवस एक ट्रायल सेट करण्यात येणार आहे.
यापुढील सुनावणीलाही मोदी याला व्हिडिओ लिंकच्या माध्यमातूनच हजर करण्यात येणार आहे. तर, त्याचे वकील न्यायालयात हजर राहू शकतील, असे न्यायाधीश बॅरेटसर यांनी मोदीला सांगितले. कोरोना विषाणूच्या साथीमुळे सध्या ब्रिटनमधील न्यायालये रिमोट सेटिंगच्या माध्यमातून सुरू आहेत.
मोदी याच्या प्रत्यर्पण प्रकरणाची सुनावणी पहिल्या टप्प्यात मे महिन्यात जिल्हा न्यायाधीश सॅम्युअल गुजी यांनी केली होती आणि दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी 7 ते 11 सप्टेंबरदरम्यान होणार आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीमध्ये मोदी याच्याविरोधात प्राथमिक खटला निश्चित करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण होईल आणि भारतीय अधिकारी दुसऱ्यांदा त्याच्या प्रत्यर्पणासाठी मागणी करतील. या वर्षाच्या सुरुवातीला भारताची ही मागणी ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मंजूर केली होती.