काठमांडू - कोविड - 19 च्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ 5 महिन्यांच्या कालावधीनंतर नेपाळने गुरुवारी एव्हरेस्ट व अन्य हिमालयातील शिखरे पर्यटनासाठी खुली केली, अशी माहिती पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सामान्यत: मार्च ते मे दरम्यान होणाऱ्या सर्व वसंत ऋतूतील मोहिमांना कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या साथीमुळे स्थगिती देण्यात आली होती. सरकारने गिर्यारोहण मोहिमांसाठी परवानग्या देणे थांबविले होते. तसेच, दिलेल्या परवानग्याही रद्द केल्या होत्या.
“पर्वतारोहण करणार्यांसाठी पर्वत आता मोकळे झाले असून, विभागाने आज (गुरुवार) पासून नव्या गिर्यारोहकांना परवानग्या देण्यास सुरवात केली आहे,” असे पर्यटन विभागाच्या संचालक मीरा आचार्य यांनी सांगितले. आता पर्वतारोहणाच्या उद्देशाने देशात 414 शिखरे उघडली आहेत.
आर्थिक उलाढालींना चालना देण्याच्या अनुषंगाने सरकारने गुरुवारपासून हॉटेल, रेस्टॉरंट्स, ट्रेकिंग आणि पर्वतारोहण सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नेपाळ सरकार गिर्यारोहकांकडून वर्षाकाठी चार दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रॉयल्टी वसूल करते.
पर्यटन विभाग माउंट एव्हरेस्टच्या सामान्य मार्गासाठी क्लायंबिंग परमिट फी म्हणून 5,500 डॉलर्स आणि शरद ऋतूतील अन्य मार्गासाठी 5,000 डॉलर्स वसूल करतो. आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासाठी देश तयार होत असल्याने शरद ऋतूतील हंगामासाठी पर्यटक बाहेर पडण्याची अपेक्षा आहे.
‘अलगीकरणाची प्रक्रिया सुरू ठेवावी किंवा नाही, ही बाब अद्याप चर्चेत आहे. यामुळे आम्ही परदेशी गिर्यारोहकांना देशात येऊ देऊ शकत नाही,’ असे आचार्य यांनी सिन्हुआला सांगितले.
नेपाळमध्ये आतापर्यंत 19,273 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 49 लोकांचा मृत्यू झाला आहे.