जयपूर - राष्ट्रीय आयुर्वेद संस्था आता लवकरच कोरोनाच्या नमुन्यांची चाचणी सुरू करणार आहे. कोरोनाच्या नमुन्यांची चाचणी करणारी ही देशातील पहिली आयुर्वेद संस्था असेल. यासाठी आयुर्वेद संस्थेने एक अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार केली आहे. येथे केवळ कोरोनाच नाही तर इतर आजारांचीही तपासणी केली जाणार आहे. ही आयुर्वेद संस्था पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर चालवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेने आपल्या स्तरावर एक अत्याधुनिक मायक्रोबायोलॉजी लॅब तयार केली आहे. या लॅबमध्ये एकावेळी सुमारे पाच हजार कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार आहे. 95 लाख रुपये खर्चून ही लॅब तयार करण्यात आली आहे. कोरोना चाचणीसंदर्भात आयुर्वेद संस्थेने आयसीएमएआरकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर आयसीएमएआरने आयुर्वेद इन्स्टिट्यूटला मायक्रोबायोलॉजी लॅब विकसित करण्यास सांगितले होते. ही सॅब आता बनून तयार झाली आहे. या अत्याधुनिक मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये येत्या 3 ते 4 दिवसांत कोरोना आणि इतर आजारांशी संबंधित तपासण्या सुरू होणार आहेत.
देशातली पहिलीच लॅब -
राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचे संचालक डॉ. संजीव शर्मा यांनी ही मायक्रोबायोलॉजी लॅब पीपीपी तत्वावर सुरू केल्याची माहिती दिली. या लॅबमध्ये कोरोना व्यतिरिक्त इतर मोठ्या आजारांचीही तपासणी केली जाईल. एनएबीएलकडून या लॅबला प्रमाणपत्रप्राप्त झाले असून येत्या 3 ते 4 दिवसांत आयसीएमआरला यासंदर्भात पत्र लिहिले जाईल. आयसीएमएआरने मंजूरी देताच राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेत कोरोना नमुन्यांची चाचणी सुरू केली जाईल. अशी तपासणी करणारी ही देशातील पहिली आयुर्वेद संस्था असेल, असेही ते म्हणाले.