मुंबई - आयपीएलच्या १२ व्या मौसमात सर्वच संघातील खेळाडूंना दुखापतीचे ग्रहण लागले आहे. दुखापतीमुळे काही दिग्गज खेळाडू या स्पर्धेला मुकले आहेत. काही खेळाडू तर या स्पर्धेत जखमी झालेले पाहायला मिळाले. खेळाडूच्या या दुखापतीचा सर्वाधिक फटका मुंबई इंडियन्सच्या संघाला बसला आहे. त्यात आता नव्याने भर पडली आहे ती अल्जारी जोसेफ या खेळाडूची.
मुंबईकडून खेळताना पदार्पणाच्या सामन्यात जोसेफने ६ गडी बाद करत नवा विक्रम केला होता. तो आता दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी डाव्या हाताने गोलंदाजी करणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ब्यूरेने हेंड्रिक्स याची निवड करण्यात आली आहे.
हेंड्रिक्सने दक्षिण आफ्रिकेकडून १० टी-२० सामने खेळला आहे. त्याने १८.९४ च्या सरासरीने १६ गडी बाद केले आहेत. ब्युरेन हेंड्रिक्स हा यापूर्वी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून प्रतिनिधीत्व केले होते. त्याने ७ सामन्यात ९ गडी बाद केले आहेत.
मुंबई इंडियन्सने १० सामन्यात ६ सामने जिंकले असून ४ सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्स १२ गुण मिळवत सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. आयपीएलचा किताब यापूर्वी त्यांनी ३ वेळा पटकाविला आहे.