मुंबई - विदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी उद्योग विभागाच्या प्रयत्नांना यश येत असून पुढील दोन तीन दिवसांत विविध देशांतील १० गुंतवणुकदारांसोबत करार केले जाणार आहेत. याशिवाय अमेरिका, युरोप, जपान, कोरिया, तैवान आदी देशामधील गुंतवणुकदारांसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. रिब्युट इंडस्ट्रियल सेक्टर- पोस्ट कोविड या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते.
‘कोविडमुळे उद्योग क्षेत्र संकटात सापडले आहे. परंतु या संकटातून बाहेर पडण्यासाठी उद्योग विभाग प्रयत्न करत आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ६० हजार उद्योग सुरू झाले आहेत. त्यात १५ लाख कामगार रुजू झाले आहेत. काही उद्योगांना अद्याप मजुरांचा प्रश्न भेडसावत आहे. तो सोडवण्यासाठी औद्योगिक कामगार ब्यूरोची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यासाठी वेबपोर्टल तयार केले आहे. याद्वारे कुशल, अकुशल कामागारांची माहिती मिळणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात कामगार ब्यूरो रीतसर सुरू होईल,’ असे देसाई म्हणाले.
स्थलांतरित मजुरांनी पुन्हा यावे. काही उद्योग त्यांची वाट पाहत आहेत. त्यांना सर्व सहकार्य केले जाईल. त्यांची नोंदणी केली जाईल. कोरोनाच्या संकटामुळे कुठल्या राज्यातून किती लोक आले, याची नोंद ठेवली जाईल. नोंदणी हे क्रांतिकारक पाऊल ठरेल, असे देसाई यांनी सांगितले. या वेळी, लघु-सुक्ष्म व मध्यम उद्योग संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, उज्वल कोठारी, सागर भोसले आदी उपस्थित होते.