वॉशिंग्टन - अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी त्यांना सौम्य स्वरूपाच्या नैराश्याचा त्रास होत असल्याचे सांगितले आहे. कोरोना संकट, वर्णद्वेष आणि (ट्रम्प) प्रशासनाचा दांभिकपणा यामुळे आपल्याला नैराश्य आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मिशेल यांनी नुकतेच त्यांचे पॉडकास्ट सुरू केले आहे. याच्या दुसऱ्या भागात त्यांनी ही माहिती दिल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे.
‘मी मध्यरात्री अचानक पणे झोपेतून उठते. कारण, कशाबद्दल तरी मी खूप चिंताग्रस्त असते. कसलातरी ताण किंवा मनावर भार असल्यासारखे जाणवते. त्याने जडपणा येतो,’ असे मिशेल यांनी म्हटले आहे.
‘सध्याचा काळ काही फारसा चांगला नाही. मी सौम्य स्वरूपाच्या नैराश्याचा सामना करत असल्याचे मला जाणवते,’ असे या मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या.
‘मला माहीत आहे, मी सौम्य नैराश्यातून जात आहे. केवळ क्वारंटाईन असल्यामुळेच नव्हे तर, वर्णद्वेषामुळेसुद्धा. आलेल्या प्रत्येक दिवशी आत्ताच्या प्रशासनाचा दांभिक कारभारही पाहत आहे. हे सगळे निराश करणारे आहे,’ अशा शब्दांत त्यांनी मनोगत मांडले.
‘सकाळी उठणे आणि एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तीचा अपमान केल्याच्या, त्यांना जखमी केल्याच्या, ठार केल्याच्या किंवा खोटे आरोप ठेवण्यात आल्याच्या बातम्या पाहणे हे अत्यंत पीडादायक आणि मानसिक थकवा आणणारे आहे. या सगळ्याचा एक प्रकारचा भार मला जाणवतो. जो मी याआधी कधीच अनुभवला नव्हता,’ असे आपल्या मानसिक स्थितीविषयी बोलताना अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी म्हणाल्या.
‘मात्र, वेळेचे नियोजन करणे हा सगळ्या भावना नियंत्रणात ठेवण्याचा मार्ग आहे. त्यामुळे कोरोनासारख्या जागतिक आपत्तीच्या काळात प्रत्येकाने आपापला दिनक्रम कायम ठेवणे अधिक गरजेचे बनले आहे,’ असे त्यांनी सांगितले.
पॉडकास्टच्या आपल्या पहिल्या भागात मिशेल ओबामा यांनी त्यांचे पती आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची मुलाखत घेतली होती.