मुंबई - मुंबईच्या वांद्रे बस स्टॅण्ड येथून एक व्यक्ती समुद्राच्या लाटांबरोबर वाहून गेला होता. या व्यक्तीला मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी समुद्रातून एक किलोमीटर अंतरावरून बाहेर काढून त्याचा जीव वाचवला आहे. या व्यक्तीला पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या हवाली करण्यात आले असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
अनिलकुमार पिल्ले (वय 52) असे जीव वाचविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुंबईत पावसाळ्यादरम्यान समुद्रात आणि चौपाट्यांवर पाण्यात बुडण्याच्या अनेक घटना घडतात. त्यात काही लोकांचा मृत्यू होतो तर काही लोकांना लाईफ गार्ड, मुंबई अग्निशमन दल यांच्याकडून वाचवले जाते. यावर्षीही समुद्र किनारी आणि चौपाट्यांवर लाईफगार्ड आणि अग्निशमन दलाच्या जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वांद्रे बस स्टॅण्ड येथे तैनात असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना एक व्यक्ती पाण्यात पडल्याची माहिती मिळाली. हा इसम समुद्राच्या लाटांनी एक किलोमीटर आत पाण्यात वाहत गेला होता. त्वरित अग्निशमन जवानांनी पीपीई किट घालून पाण्यात उतरून दोरी आणि टायर ट्यूबच्या साहाय्याने व्यक्तीला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. या व्यक्तीला पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.