चंद्रपूर - सिंदेवाही तालुक्यापासून सहा किलोमीटर अंतरावरील गडबोरी येथील 9 महिन्याच्या बाळाला बिबट्याने घरातून उचलून नेल्याची खळबळजनक घटना घडली. त्यात बाळाचा मृत्यू झाला. तसेच बाळाला घरातून उचलून नेणाऱ्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले आहे.
स्वराज सचिन गुरूनुले असे या बाळाचे नाव आहे. तो त्याच्या आई शेजारी घरात झोपला असताना गुरुवारी पहाटे 3 वाजताच्या दरम्यान बिबट्या घरात शिरला. बिबट्याने बाळाला अलगद उचलले व तिथून बाहेर धूम ठोकली. बाळाचा आवाज आणि झालेली हालचाल पाहून घरचे लोक जागे झाले. मात्र, तोपर्यंत बिबट्या बाळाला घेवून गावाच्या बाहेर निघून गेला होता.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने अनेक ठिकाणी पिंजरे लावले होते. अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला असून या बिबट्याला अज्ञात स्थळी रवाना करण्यात आले आहे.