वर्धा- जिल्ह्यात मगिल वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर पेरणी झाली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांना केवळ 40 टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देत त्यांना पीक विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
आज विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज व पीकविमा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. यावेळी, बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याने पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. पीककर्ज वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्याचे सांगून, प्रलंबित अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून जास्तीत-जास्त पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच, पीककर्जासाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या शाखानिहाय याद्या तात्काळ उपलब्ध करून त्याची कारणे स्पष्ट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
प्रधानमंत्री पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. पुढील आठवड्यात पीककर्ज आणि पीकविम्याचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्ह्यात अचानक नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास पिकांचे प्रचंड नुकसान होईल, परिणामी पुन्हा राज्य शासनालाच शेतकऱ्यांना मदत करावी लागेल. त्यामुळे, बँकांनी 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश पालकमंत्री केदार यांनी दिले.
शेतकऱ्यांना पीककर्ज व पीकविमा काढण्यासाठी ग्रामीण भागात तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि सखी यांची नोडल एजन्सी नेमली आहे. बँकांनी त्यांच्यासोबत समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी. तसेच बँकांनी पात्र व अपात्र शेतकऱ्यांची यादी देखील तयार करावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
त्याचबरोबर, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपामध्ये अडचणी येत असल्यास बँक अधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे निर्देश पालकमंत्री केदार यांनी दिले. गतवर्षी जिल्ह्यातील 38 हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. यावर्षी तो ऐच्छिक असल्यामुळे आतापर्यंत केवळ 3 हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पीकविमा काढण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना पालकमंत्री केदार यांनी दिल्या.