पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये सुवर्ण भिशीच्या नावाखाली 30 लाखांची फसवणूक करण्याच्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 5ने अटक केले आहे. संजय मारुती कारले (42, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा शोध तळेगाव पोलीस, देहूरोड पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 5चे अधिकारी घेत होते. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट पाचने आरोपीला तळेगाव येथून अटक केली आहे. सखोल तपासाठी आरोपीला देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 5चे पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे व सावन राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की तळेगाव दाभाडे, देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणूक करून फरार झालेला आरोपी संजय मारुती कारले हा तळेगाव दाभाडे येथील त्याच्या घरी येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, संदिप ठाकरे, मयूर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर व श्यामसुंदर गुट्टे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्या
आरोपीची अधिक चौकशी केली असता देहूरोड येथे 3 आणि तळेगाव पोलीस ठाण्यात 1 असे एकूण 4 फसवणुकीचे गुन्हे त्याच्यावर असल्याचो समोर आले आहे. त्याने 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सह पोलीस निरीक्षक राम गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदिप ठाकरे, मयुर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, सावन राठोड, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांनी केली.
सोन्याची भिशी म्हणजे काय?
सोन्याची भिशी म्हणजे पैश्यांच्या बदल्यात सोन्याचे बिस्कीट किंवा सोन्याचे दागिने देण्यात येतात. त्याचा अवधी हा 4 महिने, 6 महिने आणि वर्षभराचा असतो असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे शेकडो सर्वसामान्य नागरिकांनी सोन्याच्या भिशीमध्ये पैसे गुंतवले होते. परंतु, आरोपी संजयने नागरिकांची फसवणूक केली.