अकोला - जिल्ह्यातील कोविड-19 बाधितांवर एकीकडे वैद्यकीय उपचार होत असतानाच दुसरीकडे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांची येत्या कालावधीत कडक अंमलबजावणी करावी. तसेच पुढील आठवड्यात 18, 19 व 20 जुलै हे तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन पाळावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
कावड यात्रोत्सवासंदर्भात बैठकीत बोलताना कडू म्हणाले की, खासगी शिक्षण संस्था चालकांना त्यांच्याच शाळेतून विद्यार्थ्यांसाठी लागणारी वह्या पुस्तके, गणवेश इ. साहित्य खरेदीची पालकांना सक्ती करता येत नाही. तशी त्यांनी केल्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित संस्थाचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
तसेच, जिल्ह्यात 76 वर्षांची परंपरा असलेला श्री. राजराजेश्वर कावड महोत्सव यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने साजरा करावा व परंपरेचे पालन कसे करावे? याबाबत राजराजेश्वर मंदिर समिती, कावड व पालखी मंडळे यांनी समन्वयाने निर्णय घेऊन प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा, असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले. यावेळी कावड मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे उपस्थित होते.