वर्धा- पिंपरी मेघे येथील लग्न सोहोळ्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. या विवाह सोहोळ्यातून बाधित झालेल्यांची संख्या आठवर जाऊन पोहोचली आहे. यामुळे प्रशासनाने कडक पावले उचलत नवरदेवाविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यासह 25 हजारांचा दंडही ठोठावला आहेे.
पिंपरी मेघे येथील शिवराम वाडीत 30 जूनला विवाह सोहळा संपन्न झाला. त्यापूर्वी कंदुरीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्येही लोकांची गर्दी झाली. तसेच लग्न सोहळ्यात 50 जणांनाच परवानगी होती. त्यातही अधिक लोक बोलावून नियमांची पायमल्ली करण्यात आली. या विवाह सोहळ्यात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या एकापासून नवरदेवाला चक्क कोरोनाची बाधा झाली. 7 जुलैला तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पुढे आला. त्यानंतर लगेच हाय रिस्कमधील जवळपास 35 ते 40 लोकांना विकगीकरणात ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशीच नवरदेवाची पत्नी आणि आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. पिंपरी मेघेच्या लग्नातील हे लोण तिसऱ्या दिवशी शहराच्या मध्यभागी ईतवारा परिसरात जाऊन पोहोचले.
लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या मामाची दोन मुले हे कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. यासोबतच नवरी मुलीला मेहंदी लावण्यासाठी आलेल्या तिच्या दोन मैत्रिणीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यांनतर लग्न सोहोळ्यात सहभागी झालेले गोंड प्लॉट परिसरातील नातेवाईक पॉझिटिव्ह निघालेत. रविवारी गोंडप्लॉट परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील आणखी एक जण पॉझिटिव्ह आला. अशाप्रकारे एकापासून दुसऱ्याला अशा कोरोना साखळीतून 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
यामुळे प्रशासनाने या प्रकरणात गंभीर दखल घेतली आहे. लग्न सोहळ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणे, लोकांची गर्दी करून कोरोना संसर्ग पसरविणे, याबाबत नवरदेवाविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह 25 हजाराचा आर्थिक दंड सुद्धा ठोठावण्यात आला आहे.
या लग्न सोहळ्यामुळे वाढत असलेल्या बाधितांची संख्या पाहता तीन दिवस वर्धा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदी संपल्याने आज मंगळवारपासून पुन्हा सर्व व्यवहार सुरू झाले. मात्र अचानक झालेल्या संचारबंदीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. प्रशासनालाही कठोर पावले उचलत पुढील काळात होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर निर्बंध लावावे लागले.