सोलापूर- ‘गोरगरिबांचे लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्यास सरकार तयार नाही. लोकांना खोट्या स्वप्नांची खोटी दुनिया दाखवून सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरणाचा सपाटा चालवून देश विकायला सरकार निघाले आहे, अशी टीका ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सरकारवर केली. ’सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स'च्या (सीटू) वतीने वीज महावितरण कार्यालयात लाईट बिल माफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नरसय्या आडम मास्तर यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.
आज(बुधवार) जुनी मील कंपाऊंड येथे 'सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स'च्या वतीने लॉकडाऊन काळातील सरसकट वीजबील माफ करावे ही मागणी घेऊन आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली तर महासचिव अॅड. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल माफ करा अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. विजेचा बल्ब असलेल्या टोप्या यावेळी आंदोलकांनी डोक्यात घातल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी कार्यकारी अभियंता यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात नरसय्या आडम मास्तर, अॅड.एम.एच.शेख, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शकुंतला पानिभाते,सनी शेट्टी, बापू साबळे, आरिफ मणियार आदी उपस्थित होते.