मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव तसेच शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी संध्या दोशी यांची निवड झाली. या दोन्ही नवनिर्वाचित अध्यक्षांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई शहरातील विकास कामे आणि पालिकांच्या शाळांची शैक्षणिक घोडदौड अधिक जोमाने व्हावी, असे सांगून दोघांनाही शुभेच्छा दिल्या. स्थायी समिती अध्यक्ष पदावर यशवंत जाधव यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे. तर शिक्षण समिती अध्यक्ष पदावर संध्या दोषी यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने शिवसेनेला मतदान केले आहे. राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या मतदानावर शिवसेनेचा उमेवार पहिल्यांदाच निवडून आला आहे.