ढाका - भारतीय क्रिकेट संघातील माजी फलंदाज वसीम जाफरला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांच्या मीरपूर येथील क्रिकेट अकादमीत फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. बीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
बीसीबीने जाफरशी एक वर्षाचा करार केला आहे. तो सुरुवातीला १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील संघाच्या खेळाडूंना फलंदाजीचे बारकावे शिकविणार आहे. वसीम जाफरच्या चांगल्या कामगिरीनंतर त्याला त्यांच्या राष्ट्रीय अकदामीत काम करण्याची संधी मिळेल.
बीसीबीचे कैसर अहमद याबाबत माहिती देताना म्हणाले की, जाफर यास बीसीबीच्या अकादमीत फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याच्याशी मे २०१९ ते एप्रिल २०२० पर्यंत करार करण्यात आला आहे.
वसीम जाफरने भारताकडून ३१ कसोटी सामने खेळला असून त्यात १ हजार ९४४ धावा केल्या आहेत. तसेच त्याला २ एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १८ हजार पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. तसेच रणजी ट्रॉफीत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.