नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी सतत पाठपुरावा करणारे लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना राम मंदिर भूमिपूजनासाठी बोलवण्यात आले नसल्याच्या बातम्या खोट्या आहेत. वाद निर्माण करण्यासाठी या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचे स्पष्टीकरण श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रभारी अधिकारी प्रकाश गुप्ता यांनी दिले आहे.
गुप्ता पुढे म्हणाले की, राम मंदिर निर्मिती आंदोलनासाठी ज्या व्यक्तींचे मोठे सहकार्य लाभले, त्या सर्व व्यक्तींना भूमिपूजनासाठी बोलावण्यात आले आहे. अडवाणी आणि जोशी यांना ई-मेल आणि आणि फोन करून आमंत्रण देण्यात आले आहे. कोरोना आणि आरोग्याच्या कारणामुळे काही महत्त्वपूर्ण व्यक्तींना भूमिपूजनाला येता येणार नाही. काहींना लांबचा प्रवास करता येणार नाही किंवा त्रास होईल, यामुळे देखील भूमिपूजनाला लोकांची संख्या कमी राहू शकते, मात्र कुणाला निमंत्रणच न देण्याचा प्रश्नच नाही. संस्थेने सर्वांच्या भावनांची कदर राखली आहे, असे गुप्ता म्हणाले.
पोस्टाने आमंत्रण वेळेवर पोहोचेल याची खात्री नाही. ई-मेल आणि फोनने दिलेले आमंत्रण सोयिस्कर आहे. फोनने दिलेल्या आमंत्रणात एक आपलेपणाची भावना जाणवते म्हणून, अडवाणी आणि जोशी यांना फोन करून आमंत्रण देण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत अडवाणी याना फोन केला असता, फोन उचलणाऱ्या व्यक्तीने, अडवाणी यांनी भूमिपूजनाला जाण्याबाबत अजून निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. मात्र, त्याने फोनद्वारे आमंत्रण मिळाल्याचे सांगितले आहे. याबाबत अडवाणी यांचे सचिव दीपक चोप्रा यांना संपर्क केला असता त्यांनी उत्तर दिले नाही. अडवाणी आणि जोशी हे दोघेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजनाला उपस्थित राहू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, राममंदिर भूमिपूजनाची तयारी जोरात सुरू असून येत्या 5 ऑगस्टला मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.