पुणे- ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात शेताच्या बांधावर भावकीचे वाद रोजच पहायला मिळतात. मात्र हाच शाब्दिक वाद जेव्हा जिवावर येतो, तेव्हा अनर्थ घडतो. असाच प्रकार जुन्नर तालुक्यात वारूळवाडी येथे घडला आहे. शेतातील रस्त्याने ट्रॅक्टर नेण्याच्या वादातून, एका चुलत भावाने दुसऱ्या भावावर सुरीने हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी विशाल मेहेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महेश सुरेश मेहेर (वय 33) असे जखमी भावाचे नाव आहे. महेश व विशाल हे दोघे नात्याने चुलत भाऊ आहेत. 26 जुलैला सकाळी 11 च्या सुमारास वारूळवाडी येथील पाण्याच्या टाकी जवळ तक्रारकर्ता महेश मेहेर हे आपल्या शेतामध्ये काम करीत होते. त्यावेळी आरोपी विशाल मेहेर हा शेतातील रस्त्याने ट्रॅक्टर घेऊन येत होता. त्यावेळी महेश यांनी 'तू आमच्या मालकीच्या रस्त्याने ट्रॅक्टर का आणलास?' असे विचारले असता आरोपी विशाल हा महेश यांच्या अंगावर धावून आला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र संतापलेल्या विशालने ”आता तुला एकदाचा खल्लास करतो" असे म्हणून खिशातील सुरी बाहेर काढली व ती महेशच्या पोटात खुपसली, तसेच महेशच्या डाव्या हाताच्या दंडावर मारून गंभीर दुखापत केली.
रक्तबंबाळ अवस्थेत महेश जागीच कोसळला. त्यानंतर आरोपी विशालने घटनास्थळावरून पळ काढला. शेतातील इतर गावकऱ्यांनी महेशला तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.