भंडारा- आज जिल्ह्यात पुन्हा 7 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 248 झाली आहे. तर 5 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून 46 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
आज आढळलेल्या 7 रुग्णांमध्ये तुमसर तालुक्यातील 4, साकोली तालुक्यातील 2 आणि भंडारा तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. रुग्णांमध्ये तुमसर तालुक्यातील 34 वर्षीय 60 वर्षीय आणि 45 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे, तर एक 25 वर्षीय महिला देखील पॉझिटिव आढळली आहे. हे चारही लोक एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. तर साकोली तालुक्यातील पॉझिटिव्ह आलेल्या दोन लोकांमध्ये 45 वर्षीय आरोग्य कर्मचारी तर ओमान येथून आलेल्या 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात आढळलेला 50 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो सुद्धा कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आलेला होता.
दरम्यान, 197 लोकांनी कोरोनावर मात केली असून सध्या 46 रुग्ण उपचार घेत आहेत, तर दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात आज पुन्हा 3 नवीन कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आले असून यापैकी एक तुमसर पोलीस ठाणे तर दुसरा तुमसर शहरातील गोवर्धन नगर परिसरातील आहे. तर तिसरा तुमसर तालुक्यातीलच हिवरा गावातील आहे.
तुमसर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाई पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक, उप पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस अधिकारी यांनी स्वतःला होम क्वारांटाईन करून घेतले असून, घरूनच सर्व पोलीस यंत्रणा प्रभावीपणे सुरू ठेवल्या जात आहे.