इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मदत करण्यासाठी 15 विशेष सहाय्यक(SAPM) नेमलेले आहेत. यातील 7 विशेष सहाय्याकांकडे दोन देशांचे नागरिकत्व असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तान सरकारने सर्व सहाय्यकांची संपत्ती आणि नागरिकत्वाची माहिती संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
सरकारच्या कॅबिनेट विभागाच्या संकेतस्थळावर ही माहिती अपलोड करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानातील द ट्रिब्युन या वृत्तपत्राने दिली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशानुसार ही माहिती जाहीर करण्यात आल्याचे माहिती मंत्रालयाचे मंत्री शिबली फराज यांनी ट्विट केले.
जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये पंतप्रधानांचे अर्थ आणि महसूल विभागाचे सल्लागार अब्दुल हफिज शेख आणि वाणिज्य आणि गुंतवणूक विभागाचे सल्लागार अब्दुल रझाक दाऊद यांची माहिती देण्यात आली नाही. पंतप्रधानांच्या जवळील व्यक्तींची संपत्ती आणि इतर माहिती जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून होेत होती. त्यानुसार ही माहिती सार्वजनिक करण्यात आली होती.