नागपूर- जिल्ह्यात अवैध रेती तस्करीचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येताच गुन्हे शाखेने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत गुन्हे शाखा झोन पाचच्या पथकाने कामठी मार्गावर नाकेबंदी केली होती. या मार्गावरून अवैध रेती वाहतूक करणारे 4 ट्रक पोलिसांनी जप्त केले आहेत.
नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी सुरू आहे. रेती चोरी संदर्भात काही दिवसांपूर्वीच नागपुरात पालकमंत्री यांनी अवैध रेती वर रोख लावण्या संदर्भात सूचना केल्या होत्या. भंडारा जिल्ह्यातून रेतीने भरलेले ट्रक चोरट्या मार्गाने नागपुरात येत असल्याच्या अनेक घटना उजेडात आल्यानंतर नागपूर पोलीस विभागाने रेती चोरी विरुद्ध कारवाईची योजना आखली.
या पार्श्वभूमीवर पहिली कारवाई कामठी मार्गावर करण्यात आली. भंडारा येथून काही ट्रक येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपलवाडी येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. त्याचवेळी 4 मोठे ट्रक (टिप्पर) रेती भरून नागपूर शहरात जात असता या ट्रकना थांबवून कारवाई करण्यात आली. या संदर्भात यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.