गडचिरोली- जिल्ह्यात आज दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज प्रवाहाचा धक्का बसल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कुंभीटोला येथील उमेश काटेंगे हा मोटार पंप सुरू करताना वीज प्रवाहाचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर मुडझा येथे वीज तारांना स्पर्श होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
उमेश काटेंगे (वय 30 रा. कुंभीटोला, ता. कुरखेडा), नंदाबाई पुंडलिक नैताम (वय 60) आणि अंजनाबाई गोपाळा राऊत (वय 65) (दोघीही रा. गोकुळनगर) अशी मृतांची नावे आहेत. कुंभीटोला येथील उमेश काटेंगे या युवकाची सती नदीच्या काठावर शेती आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास धानाच्या रोवणीकरिता उमेश नदी पात्रात असलेल्या विहिरीतील मोटारपंप सुरू करण्यासाठी गेला होता. मात्र, मोटारपंपाला स्पर्श करताच त्याला वीज प्रवाहाचा धक्का लागला व तो बेशुद्ध झाला. नागरिकांनी त्याला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाला. उमेश काटेंगेच्या पश्चात पत्नी व तीन मुली आहेत. पत्नीच्या नावावर दोन एकर शेती आहे. घरच्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय पोरके झाले आहे.
दुसरी घटना गडचिरोली तालुक्यातील मुडझा येथे घडली. गडचिरोली शहरातील काही महिला मुडझा येथे रोवणीकरिता गेल्या होत्या. वैनगंगा नदीच्या काठावरील शेतात पोहोचताच जीवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने नंदाबाई पुंडलिक नैताम आणि अंजनाबाई गोपाळा राऊत या दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गोकुळनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गडचिरोली पोलीस घटनेचा तपास करत आहेत.