नाशिक- दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे कोरोनामुळे 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वृद्धाला त्रास जाणवू लागल्याने त्यांना मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु, तेथेही त्रास वाढल्याने त्यांना नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब घेण्यात आला व उपचार सुरू करण्यात आले. मात्र, रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
मृत रुग्णाचा अहवाल सकाळी प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह निघाला आहे. या रुग्णाच्या निधनानंतर मोहाडी गाव हादरले असून सर्वांनी सुरक्षितता बाळगावी व घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. याकामी लोकांमध्ये जागृता वाढवावी, यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी सुचना दिल्या आहेत.
दरम्यान, दहिवी येथेही काल एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मृत्यूंची संख्या दोनवर तर कोरोना रुग्णांची संख्या 58 वर पोहोचली आहे. शेतकर्यांनी भाजीपाला विक्रीचे व्यवहार करताना काळजी घेण्याची गरज असून नाशिक बाजार समिती किंवा अन्य कोणत्याही बाजार समितीत भाजीपाला ने आण करताना पिकअप चालकांना तपासणी करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.