पनवेल - धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी समाजाच्यावतीने शेळ्या-मेंढ्यासह विधानभवनावर मोर्चा काढण्यात येत आहे. महाड येथून सुरू झालेला हा मोर्चा पनवेलच्या कळंबोलीत दाखल होताच समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे धनगर समाजात सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे.
आदिवासी वर्गात आरक्षण मिळावे, यासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाचा महाडहून निघालेल्या मोर्चा बुधवारी कळंबोलीमध्ये दाखल झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची अडवणूक केली. तसेच धनगर समाजाचे समन्वयक पडळकर आणि जानकर यांच्यासह अनेक समन्वयकांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी पनवेल, कामोठे आणि कळंबोली परिसरातून आलेल्या समन्वयकांना विधान भवनावर मोर्चा काढण्यापासून रोखले आहे. यावेळी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत आंदोलकांनी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, विधानसभेच्या पायऱ्यांवर जाण्यापासून आंदोलकांना सरकार जाणून बुजून अडवत असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. सरकारची ही पोलीस कारवाई म्हणजे धनगर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका पडवळकर यांनी केली आहे.