नवी दिल्ली - भारतीय युवा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पेट्रोलियम मंत्रालयाबाहेर एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले. या आठवड्यात गॅस सिलेंडरच्या दरात 25.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्ली युवा काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते हातात फलक घेऊन पेट्रोलियम मंत्रालयाच्या बाहेर जमले आणि त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
माध्यमांशी बोलताना युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. म्हणाले, "देशातील जनतेला भाजपाच्या 'महागड्या दिवसां'पासून मुक्ती पाहिजे आहे.' भाजप सरकारवर टीकेची झोड उठवत ते पुढे म्हणाले की, भाजपाचे अच्छे दिन बरेच महाग झाले आहेत. गॅस सिलिंडरची खरेदी करताना सर्वसामान्य लोकांना अडचणी येत आहेत. दिवसेंदिवस इंधन आणि गॅसच्या दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. लोकांना महागड्या वस्तू खरेदी करून कथित 'अच्छे दिन'ची किंमत मोजावी लागत आहे, असा शाब्दिक हल्ला त्यांनी केला.
श्रीनिवास म्हणाले की, लोक बेरोजगारी, आर्थिक असहाय्यता आणि महागाईचा सामना करीत आहेत. तर 97 टक्के कुटुंबांचे उत्पन्न कमी झाले आहे. सध्याच्या भाजपा सरकारच्या काळात मनमोहन सिंग सरकारच्या तुलनेत गॅस सिलिंडरच्या किंमती दुप्पट वाढल्या आहेत, गेल्या सहा महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 140 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे, असंही ते म्हणाले.
एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 25.50 रुपयांची वाढ झाली आहे. यासह दिल्लीमध्ये सिलिंडरची किंमत आता 834.50 रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीतही 76.50 रुपयांची वाढ झाली आहे. मोदी सरकार जनतेला कशासाठी शिक्षा देत आहेत?, असा सवाल श्रीनिवास यांनी केला.