वलसाड (गुजरात) : गुजरातच्या वलसाड येथे मुंबई सुरत हायवेवर एक विचित्र अपघात झाला. मुंबईहून सुरतकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचे अचानक स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर उलटला. हा कंटेनर रस्त्याच्या पलिकडे उभ्या असलेल्या कारवर आदळला. मात्र या अपघातातून कार चालक चमत्कारिकरित्या बचावला आहे. अपघातात जखमी झालेल्या कंटेनर चालकाला जवळच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनेची माहिती ग्रामीण पोलिस पथक घटना स्थळी दाखल झाले आहे.
कार कंटेनरच्या खाली गाडली गेली : मुंबईहून मालाने भरलेला कंटेनर सुरतच्या दिशेने जात होता. दरम्यान, वलसाड जवळ महामार्गावर कंटेनर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि त्याने कारला धडक दिली. अपघातात कार पूर्णपणे कंटेनरच्या खाली गाडली गेली. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली. अडकलेल्या कार चालक व कंटेनर चालकाला बचाव पथकाच्या मदतीने बाहेर काढून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांच्या पथकाला समजल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ क्रेनच्या साहाय्याने उलटलेला कंटेनर हटवून पुढील कारवाई केली.
हरिद्वारमध्ये कारने वरातींना चिरडले : हरिद्वारमध्ये एका मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकाने लग्नाच्या वरातीला धडक दिली. गाडी एवढ्या वेगात होती की, ती एक-दोन जणांना धडकल्यानंतरही थांबली नाही. या अपघातात एका बँड सदस्याचा जागीच मृत्यू झाला. तर मिरवणुकीतील 31 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर काही अंतरावर थांबलेल्या स्कॉर्पिओ कारला लोकांनी घेराव घातला व कारचालक आणि त्यातील लोकांना बेदम मारहाण केली. स्कॉर्पिओ गाडीत ५ जण होते. पाचही जण दारू प्यायलेले होते. वरातींनी केलेल्या मारहाणीनंतर या सर्वांनाही दुखापत झाली आहे. यापैकी चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर संतप्त वरातींनी स्कॉर्पिओ गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तक्रारीच्या आधारे संबंधित कलमांतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.
पुण्यात कंटेनरची चार वाहनांना धडक : पुणे शहरातील नवले पूल परिसरात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने चार वाहनांना धडक दिली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. वाहतूक कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने रस्त्याने येणारी वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. कंटेनरने दोन चारचाकी, एक तीनचाकी रिक्षा व एका दुचाकीला धडक दिली. घटनेनंतर नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून इतर वाहनामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
हेही वाचा : Haridwar Car Accident : भरधाव स्कॉर्पिओने लग्नाच्या वरातीला चिरडले ; एक ठार, 31 जखमी