जौनपूर Jaunpur Urinate Case : उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये एका मागास जातीच्या तरुणासोबत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तीन ते चार तरुणांनी सुरुवातीला या तरुणाला तलावात बुडवून मारहाण केली. त्यानंतर त्याला त्याचंच मूत्र प्यायला लावलं. मारहाण करणारे नराधम एवढ्यावरच थांबले नाही तर ते या तरुणाला मारहाण करतच राहिले. त्यानंतर त्याच्या तोंडात त्यानंच लघुशंका केलेल्या मातीचा तोबरा भरुन पुन्हा मारहाण केली. या नराधमांनी त्याच्या भुवयाही उपटल्या. यानंतर त्याच्या वडिलांना बोलावून त्यांनाही मारहाण करण्यात आली.
मुलीचा विनयभंग - हे प्रकरण जौनपूर जिल्ह्यातील सुजानगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे. सूडाच्या भावनेनं या तरुणावर अमानुषपणे अत्याचार केल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये या तरुणाला मारहाण करणाऱ्यांनी त्यानं आपल्या कुटुंबातील मुलीचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप करत फिर्याद दिली आहे. तर पीडिताच्या बाजूकडून त्याच्यावर नराधमांनी अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. त्यानं त्याच्याबाबत घडलेल्या क्रूरतेची कहाणीच सांगितली आहे.
तोंडात मूत्रमिश्रित चिखल - पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. शेखपूर खुठाणी गावात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडल्याचं पीडित तरुणाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. त्याला पकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्याच्या तोंडात मूत्रमिश्रित चिखल भरण्यात आला. त्याला तलावात बुडवून मारहाण केली. त्याला मूत्रही पाजलं. पीडितताच्या भुवयाही क्रूरपणे सोलण्यात आल्या, असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं. दुसरीकडे यातील आरोपी तरुणाने सुजानगंज पोलिसात तक्रारही दिली आहे. कॉलेजमध्ये जात असताना पीडितानं त्याच्या घरातील मुलीचा विनयभंग केल्याचं त्याचं म्हणणं आहे. अर्वाच्य शब्दात तो तिच्याशी बोलल्याचाही त्याचा आरोप आहे.
दोघे पोलिसांच्या ताब्यात - सध्या पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे. घटनेबाबत तपास अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितलं की, दोन्ही बाजूकडून तक्रार करण्यात आली आहे. दोन तरुणांनी पीडित तरुणाला मारहाण, शिवीगाळ आणि अपमानित केलं. तसंच उलट पक्षाकडून पीडितानं आणि त्याच्या साथीदाराने मुलीचा विनयभंग केला. तसंच अश्लील शब्द वापरले. या प्रकरणी दोन्ही अर्जांवर सुजानगंज पोलीस ठाण्यात योग्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. दोन्ही पक्षातील प्रत्येकी एकास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असं पोलिसांनी सांगितलं.