नवी दिल्ली - लखीमपूर हिंसाचार प्रकरणी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला ( Ashish Misra Gets Bail in Lakhimpur Kheri violence ) उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने आशिष मिश्राचा जामीन मंजूर केला. आशिष मिश्रा उद्यापर्यंत तुरुंगातून बाहेर येईल.
उत्तर प्रदेश एसआयटीने नुकतेच लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. 5000 पानांच्या आरोपपत्रात SIT ने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मुख्य आरोपी म्हणून नोंदवले होते. एवढेच नाही तर एसआयटीच्या म्हणण्यानुसार, आशिष हा घटनास्थळी उपस्थित होता. आशिष मिश्राने गोळीबार केल्याची पुष्टी एसआयटीने आपल्या तपासात केली होती. आशिष मिश्रा आणि अंकित दास यांनी परवानाधारक शस्त्रांमधून गोळीबार केल्याचे एसआयटीने आपल्या तपासात म्हटलं. तर आशिष मिश्राने हे नाकारले असून गेल्या एका वर्षभरापासून मी शस्त्राने गोळीबार केला नसल्याचे म्हटलं.
काय आहे प्रकरण?
३ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खिरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा प्रताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आली. हा सर्व प्रकार जाणूनबूजून करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार घडल्यानंतर शेतकऱ्यांनी या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच कारमध्ये बसलेले भाजपा कार्यकर्ता आणि आशिष मिश्रा यांना घेरले. त्यानंतर आशिष मिश्रा यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले होते.
हेही वाचा - लखीमपूर खीरी येथे नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम...