कोलकाता - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले आहेत. कोलाकातामध्ये दाखल होताच शाह यांनी कोलकातामधील रामकृष्ण मिशन आश्रमात उपस्थिती लावून स्वामी विवेकानंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शाह यांची मिदनापूरमध्ये सभा-
पंश्चिम बंगाल विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी बंगालमधील दौरे वाढवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतील. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या आमदारांचे राजीनामा सत्र सुरू असतानाच अमित शाह आज पश्चिम बंगाल मध्ये दाखल झाले आहेत. तृणमूल काँग्रेसमधील वजनदार नेते म्हणून परिचित असलेले सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी राजीनामा दिला. त्यानंतर त्याच्यासह शीलभद्रा दत्त आणि बन्सारी मैत्य यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला.
सुवेंदु अधिकारी, यांनी आपल्या मंत्री पदासह पक्षाच्या सर्वच पदावरून राजीनामा दिला. ते आज मिदनापूर इतर बंडखोर नेते आणि कार्यकर्त्यासह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांची आज मिदनापूरमध्ये एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत.