नवी दिल्ली : मॅट्रीमोनियल साईटवर तब्बल 700 भारतीय मुलींना फसवणाऱ्या दोन नायजेरियन भामट्यांना पोलिसांनी अटक केली. चीफ मांडे आणि इग्वेम्मा जेम्स एस ओ चेडोगी अशी आरोपींची नावे आहेत. हे भामटे मॅट्रीमोनियाल वेबसाइटच्या माध्यमातून मुलींशी संपर्क साधायचे, नंतर त्यांच्याशी व्हॉट्सअॅपवर बोलायचे. त्यानंतर मात्र महागड्या भेटवस्तू देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळायचे. हे दोघे निलोथी एक्स्टेंशन, निहाल विहार येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हरेंद्र सिंह यांनी दिली.
महागड्या भेटवस्तू देण्याच्या नावाने फसवणूक : राणी बागमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने मॅट्रीमोनियल साईटवर आपले नाव नोंदवले होते. त्यामुळे या साईटवर तिची अहमद नफीस नावाच्या युजरशी ऑनलाइन ओळख झाली. अहमद हा स्वत:ला एनआरआय डॉक्टर असल्याची माहिती त्याने पीडितेला दिली होती. त्यामुळे त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू झाले. अहमदने तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याचे पीडितेला सांगितले. तेथील काही फोटोही त्याने पीडितेशी शेअर केले आहेत. अहमदने पीडितेला एक महागडी भेट पाठवत असल्याचे सांगितले.
गिफ्ट सोडवायला भरले 2 लाख 40 हजार : अहमदने गिफ्ट पाठवल्याचे सांगितल्यानंतर पीडितेला रिया मेहता या महिला कॉलरच्या नावाचा फोन आला. तिने सीमा शुल्क विभागातून बोलत असल्याचे सांगून गिफ्ट पार्सलसाठी कस्टम ड्युटी आणि इतर टॅक्सचे 2 लाख 40 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यामुळे पीडितेने वेळोवेळी ही रक्कम भरली. मात्र त्यानंतर पीडितेने अहमदला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तर त्याचा फोन बंद होता. अहमदने वेबसाइटवरून त्याचे प्रोफाईलही काढून टाकले. त्यामुळे पीडितेने पोलिसात तक्रार करत एफआयआर दाखल केला.
असे उघड झाले कांड : पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तपास सुरू केला. तक्रारदाराकडून आरोपीची वेबसाईट, व्हॉट्सअॅप आणि कोणत्या खात्यात रक्कम ट्रान्सफर झाली याबाबत माहिती घेण्यात आली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस निहाल विहार भागातील लोकेशनवर आले. येथे पोलीस पथकाने छापा टाकून दोन्ही नायजेरियन भामट्यांना अटक केली. या फसवणूक प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली. यावेळी त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्याचे उघड झाले. पकडले जाण्याच्या भीतीने दोघांनी त्यांचे पासपोर्टही नष्ट केले होते. 2018 मध्ये दोन्ही आरोपी भारतात आले होते. व्हिसाची मुदत संपूनही दोघेही भारतात राहत होते.
अशी करायचे फसवणूक : आरोपींनी त्यांचा बायोडेटा शादी डॉट कॉम, भारत मॅट्रिमोनियल, जीवनसाथी, घटस्फोट इत्यादी मॅट्रिमोनियल साइटवर अपलोड केला आहे. ते स्वत:ला डॉक्टर, पायलट आणि प्राध्यापक म्हणवून श्रीमंत असल्याचे भासवतात. यानंतर मुलींचा बायोडेटा पाहून त्यांच्याशी संपर्क साधून व्हॉट्सअॅप चॅटिंग करतात. काही वेळ चॅटिंग केल्यानंतर बनावट प्रोफाईल पिक्चर्स शेअर करतात. त्यानंतर एक महागडे गिफ्ट घेऊन भारतात येत असल्याचे सांगतात. मग फोन करुन विमानतळावर पकडला गेल्याची थाप मारतात. महागड्या गिफ्टवर काही कस्टम ड्युटी लावली आहे, ती सोडवायची म्हणून पैसे देऊन सोडवण्याची विनंती करतात. पैसे भरल्यानंतर महिला तात्काळ हे पैसे इतर खात्यात ट्रांस्फर करुन खाते बंद करुन पोबारा करतात. पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेले फोन तपासले असता 2018 पासून फसवणुकीचा व्यवसाय सुरू झाल्याचे निष्पन्न झाले. या फसवणुकीच्या पैशातून आरोपींनी नायजेरियात जमीनही खरेदी केली आहे.
हेही वाचा - Wrestlers Protest At Jantar Mantar : कुस्तीपटूंचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच; कुस्तीपटूंच्या मदतीला सरसावले भूपेंद्र सिंह हुड्डा