कुलगाम ( जम्मू आणि काश्मीर ) : कुलगामच्या हदी गावाच्या भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रात्रीपासून चकमक सुरु ( Kulgam clash ) आहे. या कारवाईदरम्यान दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले ( Two local militants surrender in Kulgam ) आहे. हे पोलीस आणि लष्कराचे मोठे यश मानले जात आहे.
पथकांची संयुक्त कारवाई : प्राप्त झालेल्या प्राथमिक तपशिलानुसार, रात्री उशिरा चकमक सुरू झाली. कुलगामचे पोलीस अधीक्षक डॉ. संदीप चक्रवर्ती यांनी वार्ताहराला सांगितले की, दोन स्थानिक अतिरेक्यांनी आज आत्मसमर्पण केले आहे. कुलगाम पोलीस, लष्कर, सीआरपीएफ आणि आर. आर चे संयुक्त पथक ही कारवाई करत आहे. याबाबत जम्मू- काश्मीर पोलिसांनी ट्विटही केले आहे.
शोधमोहीम राबवून केली घेराबंदी : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील हदिगाम भागात रात्रभर झालेल्या चकमकीनंतर बुधवारी नव्याने भरती झालेल्या दोन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरेक्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीवरून, लष्कराच्या 9 आरआर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी जिल्ह्यातील हदीगाम भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.
दोन्हीही अतिरेकी स्थानिक : ते म्हणाले की, संयुक्त पथक संशयित जागेच्या दिशेने येत असताना लपलेल्या अतिरेक्यांनी सैन्यावर गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. "दोन्ही अतिरेकी स्थानिक आहेत हे समजल्यानंतर, त्यांच्या कुटुंबियांना घटनास्थळी आणण्यात आले आणि त्यांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त केले, अखेरीस त्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले," असे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 अतिरेकी ठार