डेहराडून Tunnel Project in Uttarakhand : उत्तराखंडमधील उत्तरकाशी सिलक्यारा बोगदा सध्या चर्चेत आहे. गेल्या 16 दिवसांपासून या बोगद्यात 41 मजूर अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. उत्तरकाशी सिलक्यारा बोगदा दुर्घटनेनंतर उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या बोगद्यांच्या कामांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून उपाययोजनांची चर्चा सुरू आहे.
उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 15 दिवस उलटूनही बचावकार्याला यश आलेलं नाही. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी आधुनिक यंत्रांचाच नाही, तर देशातील विविध संस्थांचे शास्त्रज्ञ तसंच परदेशी शास्त्रज्ञही मदतकार्यात गुंतले आहेत. त्यानिमित्तानं बोगद्यांचं काम सुरू करण्यासाठी शास्त्रीय अभ्यासाची गरज व्यक्त होत आहे.
पुढील 10 वर्षांत राज्यात सुमारे 66 बोगदे प्रस्तावित : उत्तराखंडच्या डोंगराळ राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वेगानं काम केलं जातंय. यामध्ये प्रामुख्यानं नवीन रेल्वे प्रकल्प, रस्ते प्रकल्प आणि ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. डोंगराळ भागात बहुतांश ठिकाणी बोगद्याचं बांधकाम प्रस्तावित आहे. पुढील दहा वर्षांत, उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य असेल जिथं जास्तीत जास्त रेल्वे आणि रस्ते बोगदे बांधले जातील. सध्या उत्तराखंडमध्ये एकूण 18 लहान-मोठे बोगदे कार्यरत आहेत. यासोबतच विविध प्रकल्पांतर्गत 66 बोगदे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
डेहराडून ते टिहरीपर्यंत मोठे बोगदे बांधले जाणार : उत्तरखंडातील ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पात 17 बोगदे बांधले जाणार आहेत. या अंतर्गत देवप्रयाग ते जनसूपर्यंत सुमारे 14 किमी लांबीच्या बोगद्याचं बांधकाम सुरू आहे. हा देशातील दुसरा सर्वात मोठा बोगदा असेल. याशिवाय, डेहराडून आणि टिहरी दरम्यान 30 किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा रस्ता बोगदा देखील प्रस्तावित आहे. याच्या बांधकामामुळं डेहराडून ते टिहरीमधील अंतर सुमारे 105 किलोमीटरनं कमी होणार आहे.
देशातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा टिहरी जिल्ह्यात प्रस्तावित : गंगोत्री ते यमुनोत्री धामला जोडण्यासाठी 121 किमी लांबीचा रेल्वे मार्ग प्रकल्पदेखील प्रस्तावित आहे. या प्रकल्पांतर्गत टिहरी जिल्ह्यातील जाजल आणि मरोर दरम्यान सुमारे 17 किमी लांबीचा रेल्वे बोगदा बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पात सुमारे 20 बोगदे बांधण्याचे प्रस्तावित आहे. या क्रमानं, चारधाम विकास प्रकल्पांतर्गत, बद्रीनाथ ते गौरीकुंड राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी रुद्रप्रयागमध्ये 902 मीटरचा बोगदा बांधण्याचा प्रस्ताव आहे, जो सुमारे 200 कोटी रुपये खर्चून बांधला जाईल.
शास्त्रज्ञ काय म्हणतात : वाडिया इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ कलाचंद साई म्हणाले की, जेव्हा बोगदा बांधला जातो, तेव्हा ते भूगर्भीय खडक किती कठीण आणि किती मऊ आहे याची चाचणी घेण्यात येते. मऊ खडकामुळं लोक तिथं कोणतंही काम करण्यास नकार देतात. भू-भौतिकीय अभ्यास देखील बोगद्याच्या बांधकामात खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्या पृष्ठभागाबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळं हिमालयीन प्रदेशात कोणतंही विकासाचं काम करायचं असल्यास भूगर्भीय आणि भूभौतिकीय अभ्यास आवश्यक आहे. मऊ खडकावर काम केल्यावर समस्या निर्माण होतात, असंही डॉ कलाचंद साई यांनी सांगितलंय.
हेही वाचा :