अमरावती : तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) आंध्र प्रदेशातील अंजनाद्रीला हनुमानाचे खरे जन्मस्थान म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या रामनवमीला, म्हणजेच २१ एप्रिलला करण्यात येणार आहे.
उगादीऐवजी रामनवमीचा मुहूर्त..
टीटीडीने दिलेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक पुराव्यांच्या अभ्यासांती अंजनाद्रीच हे हनुमानाचे मूळ जन्मस्थान असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याबाबत अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी टीटीडी 'उगादी'च्या दिवशी, म्हणजेच आज याबाबतची घोषणा करणार होते. मात्र, हनुमान हे श्रीरामभक्त असल्यामुळे, रामनवमीच्या दिवशी याबाबतची घोषणा करण्याचा निर्णय देवस्थानाने घेतला आहे.
कर्नाटक आणि आंध्रमध्ये आहे वाद..
हनुमानाच्या जन्मस्थानाबाबत कित्येक वर्षांपासून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये वाद सुरू आहे. कर्नाटकचा असा दावा आहे, की राज्यातील किष्किंधा येथील अंजनाद्री डोंगरावर हनुमानाचा जन्म झाला. दुसरीकडे आंध्र प्रदेशमध्येही अंजनाद्री नावाचा डोंगर आहे, आणि त्या डोंगरावरच हनुमानाचा जन्म झाला होता असा दावा आंध्र सरकार करत आहे. २०२०च्या डिसेंबरमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानमचे ईओ जवाहर रेड्डी यांनी या गोष्टीचे पुरावे गोळा करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती.
हेही वाचा : कुरानमधील 26 आयत हटवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली