मंगळुरू (कर्नाटक) : रेल्वे रुळावर एक मोठे झाड पडलेले पाहून एका 70 वर्षीय महिलेने लाल कापड हलवून ट्रेनला थांबवले. त्यामुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे. ही घटना 21 मार्च पंचनदीजवळील मंदारा येथे घडली असून ती आत्ता उघडकीस आली आहे.
लाल कापड दाखवून ट्रेन थांबवली : 21 मार्च रोजी दुपारी 2.10 च्या सुमारास येथील रेल्वे रुळावर एक झाड पडले होते. त्यावेळी मंगळूरहून मुंबईला जाणारी मत्स्यगंधा रेल्वे या मार्गावरून धावत होती. हे लक्षात आल्यावर 70 वर्षीय चंद्रावती यांनी वेळीच प्रसंगावधान राखून लाल कापड दाखवत गाडीला थांबण्याचा इशारा केला. धोका ओळखून लोको पायलटने ट्रेनचा वेग कमी केला आणि ट्रेन थांबवली. यामुळे संभाव्य अनर्थ टळला. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर पडलेले झाड बाजूला करून गाडीला वाट मोकळी करून दिली.
महिलेचे हृदयाचे ऑपरेशन झाले आहे : याबाबत बोलताना चंद्रावती म्हणाल्या की, 'मी जेवण करून घराच्या अंगणात बसले होते. त्याचवेळी मला घरासमोरील रेल्वे रुळावर एक मोठे झाड पडलेले दिसले. या मार्गे यावेळेस दररोज मंगळुरूहून मुंबईला ट्रेन जाते हे मला माहित होते. मात्र काय करावे ते सुचत नव्हते. ट्रेनच्या हॉर्नचा आवाज ऐकून कोणाला तरी फोन करून माहिती देण्यासाठी मी घरात गेली. तेव्हा मला तिथे एक लाल कपडा दिसला. तो पकडून मी ट्रॅककडे पळत सुटले. माझ्या हृदयाचे ऑपरेशन झाले आहे. मात्र, त्याची पर्वा न करता धावत जाऊन मी ट्रेन थांबवली. त्यानंतर सुमारे अर्धा तास ट्रेन रुळावर उभी होती. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ट्रॅकवरील झाडांना बाजूला करून रेल्वेसाठी वाट मोकळी केली गेली'. 70 वर्षीय चंद्रावतीच्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होते आहे.