बंगळुरू - कर्नाटकात एका वयोवृद्ध जोडप्याने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून इच्छा मृत्यूची मागणी केली आहे. वन अधिकारी त्यांचे कॉफीचे पीक नष्ट करुन जबरदस्तीने जमीन ताब्यात घेण्याची धमकी देत आहेत. याशिवाय या अधिकाऱ्यांनी त्यांच्या उद्धवस्त केलेल्या पिकासाठी पैसेही दिले नाहीत, असे वृद्ध दांपत्याने पत्रात म्हटले आहे.
राज्य वन अधिकारी त्यांना सतत धमकावत आहेत. अधिकारी लाखो रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप दांपत्याने पत्रात केला. अधिकाऱ्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून मृत्यूची मागणी करीत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांच्या पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालय आणि मुख्य सचिवांनी पोलिस अधीक्षकांना यासंदर्भात अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिकाऱ्यांची धमकी -
प्रति एकर 5 लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला त्रास देत नाही. तुमच्या शेजाऱ्यांनीही पैसे दिले आहेत. म्हणून आम्ही त्यांना सोडलं, असं अधिकाऱ्यांनी म्हटल्यांच दांपत्याने सांगितले. तसेच राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कुणालाही पत्र लिहा. ते इथे येऊन तुमची मदत करणार नाहीत. तुम्हाला काय करायचे आहे ते करा. जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही तुम्हाला शेती करू देणार नाही, अशी धमकीही अधिकाऱ्यांनी दिल्याचे दांपत्यानी सांगितले.
काय प्रकरण -
चिकमगलुरु तालुक्यातील अल्दुपुरजवळील दुर्गा गावामधील हे जोडपे आहे. रामदेवगोडा आणि शरदम्मा यांनी हे पत्र लिहिले आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत. एका मुलाचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. तर दुसरा मुलगा स्वतंत्रपणे राहत आहे. 40 वर्षांपासून ते 15 एकर जागेवर कॉफी आणि मिरचीची लागवड करीत आहेत. वनविभागाने जबरदस्तीने 10 एकर जागेवर कब्जा केला आहे. पाच लाख रुपये न दिल्यास चंदन चोरी आणि जनावरांच्या तस्करीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.